राजमाता जिजाई - शिल्पकार

      आपला भारत देश हा "नररत्नांची खाण" म्हणून जगात सर्वत्र ओळखला जात आहे.  आणि या नररत्नांना घडण्यासाठी,  त्यांना  सहकार्य करण्यासाठी, इतकेच नव्हे तर अशा नररत्नांना घडवण्याचं महत्वपूर्ण कामही कित्येकदा महिलांनीच केलेले आहे असंच दिसून येतं.  या "महिला" कधी पत्नी बनून, कधी मावशी, कधी आत्या, कधी बहीण, कधी मैत्रीण, तर कधी माता "शिल्पकार" म्हणून समोर आल्या आहेत.   अशाच एका क्रांतिकारी महापुरुषांना घडवण्यासाठी माता बनून प्रकाशमान झालेलं एक प्रभावी व्यक्तिमत्व आहेत - राजमाता जिजाई!  समस्त - बहुजनांच्या हितासाठी ठरलेले, महाराष्ट्रामध्ये  स्व - राज्य निर्माण करणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक "शिवशाही" कार छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारे शिल्पकार म्हणून ज्यांना अत्यंत आदराने पाहिलं जातं त्या एकच व्यक्ती आहेत आणि त्या आहेत - राजमाता मातोश्री जिजाई!  चला, आज आपण त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊ!

     जिजाबाई शहाजी भोसले यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ साली सिंदखेड (बुलढाणा- विदर्भ प्रांत) येथे पिता - लखुजीराव जाधव यांच्या घरी आई - म्हाळसा  (गिरजा) यांच्या पोटी झाला.  लहानपणापासूनच जिजाबाई  हिंमतवान आणि महत्वाकांक्षी होत्या.  वयाच्या ७ व्या वर्षी त्यांचा विवाह शहाजीराजे मालोजी भोसले यांच्याशी झाला.  त्यामुळे जाधव आणि भोसले हि  २ कर्तबगार घराणे एकमेकांशी जोडली गेली.  पण नंतर दोन कुळातील भांडणामुळे त्यांच्यात वितुष्ट आले आणि जिजाबाईंनी आपल्या माहेरला विरोध करून पती - भोसले कुळाला शेवट पर्यंत साथ दिली.  खरे पाहता विवाहानंतर जिजाबाईंचे संपूर्ण जीवनच आव्हानांनी भरले होते.  अशा वातावरणात हा स्वाभिमानीपणा आणि एकनिष्ठपणा जिजाईंचा महत्त्वाचा गुणधर्म दर्शवितो.   जिजाऊंच्या पोटी एकूण सहा अपत्ये जन्माला आली,  त्यापैकी मात्र थोरला मुलगा संभाजी व धाकटा मुलगा शिवाजी हे दोघेच जगले.  दोघेही आपल्या आई-वडिलां प्रमाणेच शूर आणि पराक्रमी होते.  यापैकी स्वतःचे आणि पतीचे स्व - राज्याचे स्वप्न प्रत्यक्षात निर्माण करणाऱ्या शिवबा चा जन्म १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर झाला.  पती शहाजी वारंवार दौऱ्यावर असल्यामुळे छोट्या शिवबाला सांभाळण्याची जिम्मेदारी पूर्णपणे जिजाई वर होती.  त्यांनी शिवरायांच्या संस्कारक्षम मनावर नैतिकतेचे आणि परधर्म सहिष्णुता चे संस्कार केले.  तसेच शिवबाला लहानपणापासूनच अनेक शूर विरांच्या, त्यांच्या  पराक्रमाच्या - शौर्याच्या  कथा सांगत, सभोवताली घडणार्‍या अन्याया विरोधात लढण्यासाठी तयार करित समाजात समता, न्याय, आपलेपणा निर्माण करण्याची गरजही वेळोवेळी दर्शवली.   स्वराज्य आणि स्वातंत्र्याचे असे बीज रोवले की बाल वयातच शिवबाने मोगल शाहीला विरोध करीत स्वराज्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू केली आणि स्वराज्याचे तोरण बांधून प्रत्यक्ष कारभार सांभाळला.    विशेष म्हणजे त्या वेळी समाजात १७ व्या शतकात सर्वत्र मोगलांची, जुलमी वतनदारांची आणि पुरातन - सनातन धर्मांध विचारांची पकड मजबूत होती.  वर्णव्यवस्था, अंधश्रद्धा, जातीयता यांमध्ये समस्त बहुजन समाज विभागला गेला होता.  अशातच  स्त्री  आणि अतिशुद्रांची अवस्था तर अत्यंत खराबच होती.  कुठल्याही शिक्षणाचा अधिकार तर त्यांना नव्हताच, उलट समस्त स्त्रियांना तर चूल आणि मूल यांमध्येच गुंतवलेले असल्यामुळे त्यांच्या मध्ये स्वातंत्र्याचे अन् समतेचे विचार कसे येणार?  अशा समाज व्यवस्थेमध्ये जिजाऊ माऊलीने क्रांतीचं - स्व राज्याचं बिगुल वाजवलं आणि आदर्श शिवबा घडवला - राज्य घडवलं!

     छत्रपती शिवरायांच्या "हिंदवी स्वराज्या" साठी मार्गदर्शन करताना जिजाऊ स्वतः राज्यव्यवस्थामध्ये सुद्धा लक्ष द्यायच्या, विशेषत: शिवाजी महाराज मोहिमेवर असताना त्याच राज्यकारभार सांभाळायच्या.  त्यांनी कित्येक वेळा समतावादी, करुणाकारी - न्यायी दृष्टिकोनातूनच न्याय दिलेला पाहायला मिळतो.  इतकेच नव्हे तर दस्तुरखुद्द शिवाजी महाराजांचा निर्णयसुद्धा जिजाऊसाहेबांनी अचूक आणि परिणामकारी केलेला आढळतो.  यावरून माँसाहेबांच्या न्यायबुद्धी सोबतच त्यांच्या स्वतःच्या गुणी मुलावर - शिवबावर आंधळे नसून एक खरे - चिकित्सक असलेलं प्रेम दिसून येतं.  परिणामतः आपल्या आईच्या व्यक्तिमत्त्वाचा मुलावर म्हणजे शिवाजी राजेंवर पडलेला प्रभाव शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वातून स्पष्ट दिसतोच.  जिजाऊंनी जातिभेद, धर्मभेद, अस्पृश्यता यांना कधी थाराच दिला नाही.  याचा प्रत्यय शिवाजीराजांच्या सैन्यामधील विविध जाति - धर्माच्या असणाऱ्या मावळ्यांमुळे येतो.  त्यांच्या सैन्यात अनेक निष्ठावंत सैनिक मुसलमान होते,  अनेक किल्लेदार महार - मातंग समाजाचे होते.  इतकेच नाही तर शिवाजी महाराजांचे संत गुरु;  एक संत तुकाराम, तर दुसरे केळशीचे बाबा याकुत हे मुस्लीम संत गुरु होते.

     छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्त्रीविषयक सन्मानी दृष्टिकोनातही जिजाऊंच्या विचारांचीच छाप होती.  म्हणून स्त्रीयांवर अन्याय करणाऱ्या स्वतःच्या सरदारासही त्यांनी कठोर शिक्षा दिली.  जिजाऊंनी शिवरायांना समस्त स्त्री जातीला मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहण्यास शिकवले,  याचा प्रत्यय आपणास कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या उदाहरणावरून येईलच.  आश्चर्याची - महत्वाची विशेष गोष्ट अशी की पतीच्या निधनानंतर पत्नीने सती जायचे असते, असा त्यावेळेचा धर्म कानून जो स्त्रियांना अमानुष वागणूक देणारा आणि मानवतेला कलंकित करणारा असा होता.  त्यास सरळ सरळ ठोकर मारून जिजाऊंनी स्वतःच्या पतीच्या निधनानंतर सती न जाता,  इतिहासात स्वतःचं एक वेगळेच परंपरा - विद्रोही असं स्थान बनवले आहे.   यावरून त्यांची खंबीर ध्येयवादी,  समाज परिवर्तनवादी आणि अंधश्रद्धा - कर्मकांड विरोधक म्हणजेच  स्त्री स्वतंत्र्याची आणि प्रगतीची प्रवृत्ती दिसून येते.  आणि म्हणूनच त्या स्त्रीसत्ताक विचारवादी होत्या हे स्पष्ट दिसून येते.  या खास गोष्टीचा समस्त स्त्रियांनी आणि स्त्रियांना पुरुषांच्या गुलाम समजणार्‍या पुरुषांनीही अवश्य विचार केला पाहिजे.

     राजमाता जिजाई शिल्पकार ठरलेल्या,  या शिवरायांच्या "शिवशाही" मध्ये बहुजन आणि कष्टकऱ्यांचे हित सांभाळत असताना समस्त जनतेला अन्न - धान्याची कमतरता झाली नाही पाहिजे, त्यांची उपासमार होता कामा नये, यासाठी जिजाऊनी शिवरायांना कृषी विषयक अनेक सुविधा राबवण्याचा त्याचबरोबर प्रजेला सवलती देण्याचा सल्ला दिला.  "आपल्यावरील अन्याय दूर होऊ शकतो" असा विश्वास जनतेत निर्माण झाल्यामुळे शिवबांनी जिजाऊंच्या मदतीने आपल्या जहागिरीत लोकांचा विश्वास संपादन केला होता.  म्हणून तर पुढे या स्वराज्याच्या कार्यात लोकांचं अधिष्ठान प्राप्त झाले होते.  हेच खरे कारण आहे की,  शिवाजी महाराजांचे स्वराज्य खऱ्या अर्थाने बहुजन हिताय होत चाललं होतं.  राजमाता जिजाऊं कडून मिळालेला हा कर्तबगारीचा वसा शिवरायां कडून पुढे संभाजी राजां पर्यंत पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतो.  त्याचबरोबर आपल्यालाही आपल्या कर्तव्याची ओळख करून देतो!  अशा या महान कर्तबगार - शिल्पकार ठरलेल्या या महा शूर वीर  राज मातेचा १७ जून, १६७४ साली शिवरायांच्या पहिल्या राज्याभिषेका (६ जून,१६७४) नंतर काही दिवसांतच मृत्यू झाला.  ज्यांनी क्रांतीची ज्योत पेटवून थोर सुपुत्र शिवबा घडवला - रयतेचे स्वराज्य घडविले त्या महान - प्रेरणादायी, वंदनीय महामातेस आम्हां बालकांचे सन्मानपूर्वक - विनम्र अभिवादन!

     चला संकल्प करूया,  जिजाऊं सारखा आपणही आपला चारित्र्यवान "शिवबा" (सुपुत्र) घडवूया!