५ जून - जागतिक पर्यावरण दिन !
५ जून - जागतिक पर्यावरण दिन !
पर्यावरणात "समता" आवश्यकच!
५ जून - 'जागतिक पर्यावरण दिन' असल्यामुळे त्यानिमित्ताने पर्यावरणाची थोडक्यात पुनश्च ओळख व्हावी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपणा - मानवाची भूमिका काय? याच्या थोडक्यात केलेला ऊहापोह!
आपल्या सभोवती जे सजीव आणि निर्जीव पसरलेले आहेत त्या सर्वांना एकत्रितपणे मिळून पर्यावरण म्हणतात. या पर्यावरणाचा केंद्रबिंदू पृथ्वी असून या पृथ्वीची शिलावरण, जलावरण व वातावरण ही तीन आवरणे आहेत. अशा या महान पर्यावरणातच ही सारी सृष्टी सामावलेली आहे. आणि या निसर्ग सृष्टीतल्या जमिनीवर राहणारे आपण साऱ्या प्रचंड सजीवातले एक सजीव - मनुष्य प्राणी!
सुमारे ४०० कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर सर्व प्रथम अस्तित्वात आलेले पहिले प्राथमिक जीव, एक पेशीय सजीव प्राणी नंतर द्वीपेशीय प्राणी आणि नंतर इतर उभयचर जीवसृष्टी! कालांतराने प्राचिन - जीव युगानंतर मध्य - जीव युगातील आकाराने अत्यंत अवाढव्य असणारे प्राणी उदा. डिप्लोडोकस, ब्रौंटोसॉर, टिरानोसॉर इत्यादी डायनासोर प्राणी! तसेच धरणीकंप, ज्वालामुखीचे स्फोट, भुगर्भातील हालचाली यां मार्गे कित्येकदा पृथ्वीवर घडलेले उत्पात आणि सुमारे ४ कोटी वर्षापूर्वीच्या प्रचंड उत्पातापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाचा आजचा आकार! तदनंतर ४ लक्ष वर्षापूर्वीचा आदिमानव आणि नंतर सुमारे १ लाख वर्षापूर्वी पासूनचा आजचा आधुनिक मानव! या सर्व घडामोडींचा आपण अभ्यास केल्यास पर्यावरण हे समस्त प्राणी - मनुष्य यांच्या (सर्वांच्याच पण् विशेषत: सजीवांच्या) जीवनात महत्वाची भूमिका बजावत आहे असेच दिसून येईल. कारण पर्यावरणाशी जे जीव-जंतू-प्राणी-वनस्पती, मानव समरस झाले व जगले तेच टिकले. म्हणजे, जे पर्यावरणाशी एकरुप होऊ शकले नाहीत ते कालांतराने नष्ट झाले, हाच ज्वलंत इतिहास आहे. म्हणूनच की काय, महाकारूणीक बुद्धाने तसेच सर्वच मानवतावादी संत - महापुरुष - महामानवांनी "समता" म्हणजे समानतेच्या तत्त्वाला फार महत्व दिलेले आहे.
निसर्ग आपणांस नेहमीच सढळ हस्ते देतच आला आहे. प्राणी आणि वनस्पती ह्या सजीव आणि जमीन, हवा सूर्यप्रकाश, पाणी, खनिजे आदी निर्जीव नैसर्गिक साधन - संपत्तीचा आपण नेहमीच उपभोग घेतला. आपण जमिनीवर राहतो. जमिनीवर किंवा जमिनीच्या पोटात ठीक ठिकाणी पाणी असते, या पाण्याचा आपल्या दैनंदिन जीवनात फारच महत्त्वपूर्ण उपयोग होतो. याच जमिनीच्या भूगर्भात तांबे, सोने, कोळसा, लोह खनिज, खनिज तेल, अभ्रक, चुनखडक, मॅंगनीज, बॉक्साईट, इत्यादी विविध प्रकारची खनिजं सापडतात. त्याच जमिनीवर आपण लागवड करून विविध प्रकारची पीकंही घेतो. तसेच वनांतून आपणास साग, साल, चंदन, बांबू, देवदार, ओक, इ. झाडांपासून लाकूड, लाख, राळ, डिंक, औषधी वनस्पती, मध वगैरे - विविध उपयोगी पदार्थही मिळतात. एकंदरीत अन्न, वस्त्र, निवारा या जीवनावश्यक गोष्टी आपण याच जमिनीवरील असणाऱ्या साधन संपत्तीतून मिळवतो. हवेमुळे आपणास श्वसनासाठी/जगण्यासाठी लागणारा प्राणवायू (ऑक्सिजन) मिळतो. सूर्या पासून प्रकाश रूपाने निघालेली ऊर्जा वनस्पतींना स्वत:च्या अन्नाच्या रूपाने आणि प्राण्यांना वनस्पतींमध्ये साठवलेल्या अन्नाच्या रूपाने मिळते. आणि आपण मानव याच विविध वनस्पतींचा आणि प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतो, त्यांवर उपजीविका करतो. अशाप्रकारे निसर्गातील सूर्यप्रकाश, हवा, पाणी, जमीन, यांपासून वनस्पतींचे अन्न तयार होऊन त्यावर त्यांचे पोषण होते आणि वनस्पतींवर इतर सर्व सजीव प्राण्यांचे आणि आपलेही पोषण होते. अशा तऱ्हने पर्यावरणात ही नैसर्गिक परस्परावलंबी अन्नसाखळी निरंतर चालूच राहते आणि समतोल टिकून ठेवते.
पर्यावरणातील हे निसर्गचक्र निसर्ग - धर्मानुसार अखंडपणे चालूच आहे. या सर्वसमावेशक पर्यावरणातील विशाल निसर्गाचा मानव हा एक, बुद्धी असल्यामुळे विकसित आणि प्रगत भाग आहे. जो या पर्यावरणात पर्यावरणातील विविध घटकांचा स्वतःसाठी वापर करीत जगत आहे. आज विज्ञानाच्या सहाय्याने मानवाने जरी क्रांती केली असली तरी चंगळवादाच्या दुनियेत स्वार्थांध होऊन तो पर्यावरणावरच मात करू पाहतोय (स्वतः पर्यावरणाचा एक शुल्लक अपत्य असतानाही) आणि पर्यावरणाचा समतोल ढासळून परिणामी तो स्वतःचाच घात करू लागलाय. याची आजला अनेक कारणे जरी असली तरी मूळ कारण अज्ञान आणि वाढती लोकसंख्या हेच आहे. अज्ञानामुळे त्याला निसर्गातील समतेचं महत्त्व कळत नाही आणि परिणामी या मौल्यवान निसर्ग देणगीचा तो अपव्यय करीत आहे. या नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करणे काळाची गरज आहे, हेच तो विसरलाय. याच अज्ञानामुळे लोकसंख्या वाढ झालेली आहे. या प्रचंड लोकसंख्या वाढीमुळे अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मानवाला निसर्गावरच अतिक्रमण करावे लागत आहे. त्याला राहण्यासाठी जमीन कमी पडत असल्यामुळे समुद्रातच तो भरणी टाकून समुद्रातील मत्स्य जीवन - सजीव जीवन आणि समुद्र खनिज संपत्ती धोक्यात आणू पाहत आहे. आपल्या हौस - मौज खातीर, विविध कारणानिमित्त लाकूड जाळण्यासाठी निष्ठूरपणे तो वृक्षतोड करतोय. (एक झाड तयार होण्यासाठी अनेक वर्ष लागतात व ते तोडण्यासाठी १ तास सुद्धा लागत नाही, हे कळत असून सुद्धा!) तसेच वाढत्या लोकसंख्येला - अधिक अन्न पुरवण्यासाठी, जंगलतोड करून जमीन लागवडीखाली आणली जाते, तर कधी इमारती उभ्या राहत आहेत. कमी जमिनीत जास्तीत जास्त पिक निघावे याकरता प्रमाणाबाहेर रासायनिक खते वापरली गेल्याने जमिनीचा कस कमी होऊन काही दिवसांनी ती शेते निकामी होतात. निवार्या करताही जमीन लागत असल्याने हळूहळू जंगले नामशेष होऊन हवेचे प्रदूषण, जमिनीची धूप, पावसाची अनियमितता, इत्यादी दोष उद्भवलेत. वाढत्या लोकसंख्येला वस्त्रे आणि इतर गरजेच्या वस्तू पुरवण्या करता अधिकाधिक कारखाने उघडली जाताहेत, त्यामुळे इंधनाचे साठे संपुष्टात येण्याचा धोका उद्भवला आहे. आज पाणीटंचाई ने समस्त देशाला घेरले आणि संपूर्ण जगापुढे एक आव्हानच निर्माण केलेय. वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारीही वाढली आहेच. त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांचा लोंढा रोजगारासाठी शहराकडे वळला गेल्यामुळे शहरातील नागरी सुविधांवर ताण वाढतोय. यामुळे नागरी जन - जीवनातील स्वच्छता व शांतता नष्ट होतेय, आरोग्याची समस्या निर्माण होवून रोगराईही वाढतेय. अशा प्रकारच्या अनेक अडचणींना तोंड देण्यास पुरेशा नागरी सुविधाही उपलब्ध होऊ शकत नाहीत.
अशा रीतीने लोकसंख्या वाढीमुळे प्रचंड जागेची टंचाई, पाणी टंचाई, नैसर्गिक साधन संपत्तीचा नाश, निर्दयीपणे वृक्षतोड, जंगलतोड, हवेचे प्रदूषण, विविध रोगराई व सामाजिक अस्वस्थता, इत्यादी अनेकों समस्या वाढीस लागून निसर्गाचा समतोल बिघडतोय. जर आपल्या मानवांची लोकसंख्या अशीच (अंध-विश्वासाने ही) वाढत राहिली तर ज्याप्रमाणे डायनासॉर सारखे महाकाय प्राणी प्रचंड प्रमाणात संख्येने वाढल्याने कालांतराने नष्ट झाले, त्याप्रमाणे निसर्ग नियमाप्रमाणे पर्यावरणाशी विसंगती केल्यास अर्थात लोकसंख्या अवास्तव वाढवून पर्यावरणाचे संतुलन अधिकाधिक बिघडवल्यास आपण मानव जातही नष्ट होण्याची भीती निर्माण होऊ शकते, याचे भान आपण ठेवलेच पाहिजे. यासाठी सर्वप्रथम लोकसंख्येला आळा घालणं (जे आपल्या हातात सहज असते) फार महत्वाचे आहे. तसेच निसर्ग अभ्यासाचा आणि विज्ञानाचा प्रसार करत प्रत्येकाने किमान १ तरी झाड लावून, झाडे लावा - झाडे जगवा आणि पर्यावरण टिकवा! या मोहिमेत सामील झाले पाहिजे व झाड तोडण्यावर पूर्णपणे बंदीच आणली पाहिजे. हवेचे प्रदूषण, ध्वनि प्रदूषण आणि विविध कंपन्यांमार्फत सोडणाऱ्या केमिकल मुळे होणारे पाण्या चे प्रदूषण हे प्रकर्षाने मर्यादित करून ते रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पाणी म्हणजे जीवन, हे ओळखून पाणी वाचवले पाहिजे, पाणी साठवले पाहिजे. आपण स्वार्थांध न होता निसर्गाचे अर्थात पर्यावरणाचे संवर्धन केलेच पाहिजे. (अन्यथा निसर्गाचा प्रकोप अटळ आहे.) बर्याच प्रकारच्या उपाययोजना आहेत, पण ह्या मोजक्याच ठळकपणे सहज करता येतील अशा महत्त्वाच्या उपाययोजना काटेकोरपणे अमलात आणून आपण या पर्यावरणात समतोलपणा सहज साधू शकतो. विशेष म्हणजे - ज्याप्रमाणे निसर्ग आपणास काहीना काही नेहमीच देत असतो, त्याप्रमाणे आपणही निसर्गाकडून दानाचा धडा घेत इतरांना निस्वार्थीपणे चांगलं द्यायला शिकलंच पाहिजे. शेवटी, मानव काय, मानव समाज काय किंवा पर्यावरण काय - समता फारच आवश्यक आहे, कारण "विषमता नाश करते आणि समता साथ देते". म्हणून फक्त मानवाच्याच नव्हे तर समस्त सजीव प्राण्यांच्या जगण्यासाठी आणि कल्याणासाठी सबंध पर्यावरणातच "समता" टिकणे अत्यावश्यक आहे.
Post a Comment