कोकण भेट! (८ मे ते १३ मे, २०२२)

     मनमोहक पृथ्वीतलावरील सुंदर अशा भारताच्या नकाशातील 8 केंद्रशासित प्रदेश आणि 28 राज्यातील एक प्रभावी राज्य असे आपले महाराष्ट्र राज्य!  ज्याचा देशाच्या लोकसंख्येच्या बाबतीत २ रा क्रमांक आणि क्षेत्रफळात ३ रा क्रमांक लागतो.  एकूण 36 जिल्हे असणारे हे राज्य अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, पुणे आणि कोकण विभाग अशा सहा प्रशासकीय विभागांमध्ये गटबद्ध आहे.  असा हा महाराष्ट्र आपल्या देशाच्या पश्चिम भागात वसलेला असून तो पश्चिमेला अरबी समुद्राने, उत्तर पश्चिमेला गुजरात ने, उत्तरेत मध्यप्रदेश ने, दक्षिणेत कर्नाटकाने आणि पूर्वेला छत्तीसगड व तेलंगणा यांनी वेढलेला आहे.  प्राचीन ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या या माझ्या महाराष्ट्र मध्ये अनेक पर्यटन स्थळे असुन ती पाहण्यासाठी देश-विदेशातून लाखो पर्यटक महाराष्ट्र राज्याला भेट देण्यासाठी नेहमी येत असतात.  यात अनेक प्राचीन लेणी, गुहा, वास्तुशिल्प, मोठ - मोठ्या डोंगर - दर्या, नद्या - नाले, किल्ले, तीर्थक्षेत्रे आणि अमाप निसर्ग सौंदर्याने नटलेला कोकण समाविष्ट आहे.   अशा या सुंदर कोकणात जाण्याची सुवर्णसंधी आम्हांस अचानक प्राप्त झाली.  चला तर या निमित्ताने आपण अगोदर आपल्या या कोकणाचा थोडासा परिचय करून घेऊ. 

     महाराष्ट्रातील हा सुंदर कोकण प्रदेश भारताच्या पश्चिम समुद्रकिनारी आणि किनार्‍याला समांतर असलेली सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगा यांच्या मधला असलेला भूमीचा पट्टा असून हा 720 किलोमीटर म्हणजेच 450 मैल लांबीचा समुद्र किनारपट्टीचा भाग आहे.  असा हा महाराष्ट्रातला कोकण विभाग उत्तरेत गुजरात,  दक्षिणेत गोवा आणि  पूर्वेस कर्नाटक अशा तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो.  सुंदर, आकर्षक, मनमोहक समुद्र किनारे/बीच, धबधबे आणि डोंगर - दऱ्या व झाडं - झुडुपे लाभलेल्या या कोकण विभागात आंबा, फणस, काजू , सुपारी, नारळ, केळीच्या बागा, कोकमाची झाडे, भात शेती आणि मसाल्याचे उत्पादन ई. गोष्टी मोठ्या प्रमाणात आढळतात.  हे अल्हाददायक, प्रसन्न वातावरण, हि सृष्टि समृद्धी आणि हा मोहक निसर्ग सौंदर्य पाहिल्यास जणू काही निसर्गाने आपला हा वरदहस्त फक्त कोकण प्रदेशालाच दिला आहे की काय? असा प्रश्न पडतो.  विशेष म्हणजे,  महाराष्ट्राची राजधानी "मुंबई" ही या कोकण (अपरान्त) विभागातील पट्ट्यातच आहे.  अशा या सुप्रसिद्ध कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे 7 जिल्हे असून 47 तालुके आहेत.  आणि अश्या या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 तालुक्यांपैकी 1 असणाऱ्या वैभववाडी तालुक्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 9 तालुक्यांपैकी 1 असणाऱ्या राजापूर तालुक्यात मित्रा कडून कार्यक्रमा निमित्त जाण्याची अचानक संधी प्राप्त झाली आणि तेथे काही सुप्रसिद्ध पर्यटन स्थळं पाहण्यासही मिळाली.  या आमच्या आनंदात तुम्हालाही सहभागी करुन घेण्यासाठी; यानिमित्ताने तुम्हालाही हा प्रवास या माध्यमाद्वारे दाखवण्याची प्रबळ इच्छा आमच्यात निर्माण झाली, म्हणून हा सगळा प्रपंच!   चला तर मग,  सुरू करूयात मुंबई ते कोकण प्रवास - रेल्वेचा प्रवास!

     मुंबईतून कोकणात जाण्यासाठी दादर सेंट्रल सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस,  दिवा सावंतवाडी सिंधुदुर्ग एक्सप्रेस,  मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वडगाव मांडोवी एक्सप्रेस आणि मुंबई  छ.शि.म.ट. मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस या ४ गाड्या रोज आणि अन्य विशेष गाड्या मिळून सर्व अंदाजे ९ ते १० रेल्वे गाड्या मुंबईतून कोकणात जाण्यास आठवड्यात उपलब्ध आहेत.  कोकण रेल्वेच्या विशेष प्रवासी सोयीनुसार/आवश्यकतेनुसार गाड्यांची संख्या कमी-जास्त होत असतेच.  अशाच रविवारच्या स्पेशल 01201 - NGP MAO Special या नागपूरहून पनवेलला येणाऱ्या गाडीने आम्ही कोकणाकडे प्रवासासाठी तयार झालो.  आम्ही त्यानुसार गाडीचे रिझर्वेशनही केलं.  शनिवारी दुपारी 3.50 ला नागपूर हुन निघालेली गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 5.30 वाजता आम्हाला पनवेलहून घेवुन निघणार होती.  रविवारी घाई गडबड नको म्हणून आदल्या रात्रीच आम्हीं कुर्ला वरुन पनवेल ला जाणारी उशिराची लोकल पकडली आणि रात्री अडीच वाजण्याच्या पूर्वीच आम्हीं पनवेल ला पोहोचलो.  पनवेल स्टेशन हे नवी मुंबई येथील मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या हार्बर लाइन आणि मध्य मार्गावरील रेल्वे स्थानक आहे.  पनवेल जंक्शन असून कोकण रेल्वे मार्गे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या येथे थांबतात.  रेल्वे स्थानक सिडको द्वारे विकसित केले गेले असून येथे नवीन टर्मिनस तयार होत आहे.  अशा या पनवेल ला पोहोचल्यावर आम्ही ठरल्याप्रमाणे पनवेलच्या वेटिंग रूम मध्ये थांबून सकाळी 5.30 वाजता येणाऱ्या गाडीची वाट पाहत राहिलो.  रविवारच्या सकाळी जेव्हा येण्याची वेळ जवळ आली तेव्हा कळले की गाडी उशिराने धावत आहे.  विशेष धावणाऱ्या गाड्यांच्या बाबतीत बऱ्याचवेळा असेच उशीरा येणे होत राहते, असे आम्हाला काहीं जाणकार प्रवाशांकडून कळले.  असो, बहुप्रतिक्षित आमची ही गाडी 3 तास लेट झालेली पनवेल प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर 8.40 च्या सुमारास एकदाची आली.  आम्हीं गाडीत आमची जागा शोधली - स्थानापन्न झालो.  प्रचंड उत्सुकता पूर्वक उशिरा का होईना असणारा हा कोकण-प्रवास पनवेल पासून सुरु झाला आणि आम्ही फार फार खुश झालो.  कोकण-प्रवासात बाहेर खिडकीमधून कोकणातील तांबडी माती, मोठाले दगड, डोंगर - दर्या, नदी-नाले, झाडं -  झुडपं, शेत जमीन आणि सुंदर उतरत्या छपराची घरं पाहता पाहता आम्ही रोहा, माणगाव, खेड, चीपळून, संगमेश्वर रोड आणि रत्नागिरी पार करत नंतर राजापूर रोड रेल्वे स्टेशनला आलो.  पनवेलहून उशिरा निघाल्याने सकाळी साडे अकरा च्या ऐवजी आम्ही सायंकाळी 4.20 च्या सुमारास राजापूरला म्हणजे सुमारे 5 तास उशिरा पोहोचलो.  पण आम्हाला राजापूरला उतरताच फार समाधान वाटले.  पुढे वैभववाडी दिशेला जाणाऱ्या ट्रेन ला बाय बाय करत आम्ही राजापूर स्टेशनला थोडा वेळ थांबलो आणि कोकणात पाऊल ठेवलेल्या राजपुर रोड स्टेशन ला पूर्ण डोळे भरून पाहिले.

     राजापूर रोड रेल्वे स्थानक हे रत्नागिरी जिल्ह्यातील निखारेवाडी येथे असून यांवर 3 रेल्वे ट्रॅक आणि दोन प्लॅटफॉर्म आहेत.  मधल्या ट्रॅक वरून सहसा माल गाड्याच जात असाव्यात.  या स्थानकावर 3 एक्सप्रेस गाड्या आणि 2 प्रवासी गाड्या थांबतात.  फलाटावर प्रवाशांसाठी एक स्टॉल, पाणी पिण्याची आणि बसण्याची सोय केलेली आहे.  हे स्टेशन डोंगराच्या खोदलेल्या भागात बांधले गेले आहे, त्यामुळे हे स्टेशन उंच आणि फलाट खाली आहे.  वर स्टेशनवर  स्टेशनवरील तिकीट घर, तसेच अन्य आवश्यक गोष्टी जसे की, स्टेशन मास्तर ऑफिस,  वेटिंग रूम आणि प्रसाधनगृह इत्यादी इत्यादी गोष्टी आहेत.  राजापूर रेल्वे स्टेशनचा बाहेरचा परिसरही मनमोहक परिसर आहे, बाहेर रिक्षावाले प्रवाशांची वाट पाहत उभे असतात.  आम्हाला राजापूरला उतरून गरम पाण्याचे कुंड असणारे गाव उन्हाळे आणि नंतर जवळच सुप्रसिद्ध अर्जुना नदीवरील मोठा नविन पूल पहायचे होते.  आमची ट्रेन उशीरा आल्यामुळे आम्हाला तिथून लाल परी (एसटी) मिळाली नाही, ती निघून गेली होती आणि नंतर एसटी उपलब्ध होणार की नाही याची शाश्वतीही नव्हती.  याविषयी स्टेशनच्या बाहेरच एसटीचा बोर्ड किंवा एसटीचे वेळापत्रकही नव्हतं,  त्याच्यामुळे आम्हाला उन्हाळे ला जाण्यासाठी रिक्षा पहावी लागली.  राजापूर रोड रेल्वे स्थानकापासून उन्हाळे फक्त १४ किलोमीटर अंतरावर आहे, एसटीने आम्हाला प्रत्येकी 10 ते 15 रुपये प्रमाणे  चार जणांसाठी 40 ते 60 रुपये खर्च आला असता पण रिक्षासाठी आम्हाला चार जणांचे ४०० रुपये द्यावे लागले.  असो, रिक्षाने आम्ही मस्तपैकी गाणी ऐकत आणि गात अवघ्या १५ मिनिटात उन्हाळे गावात पोहोचलो.  रस्त्याच्या उजवीकडेच हे गरम पाण्याचा झरा असलेले ठिकाण आहे.  राजापूर एसटी बस स्थानकापासून मुंबई-गोवा महामार्गावरून आल्यास फक्त ३ किलोमीटर अंतरावर म्हणजे अगदी ५-१० मिनिटाच्या अंतरावर असलेले, अर्जुना नदीवरील जुना पूल पार केल्यास राजापूर रोड रेल्वे स्टेशनच्या मार्गावर जाण्यास डाव्या बाजूला वळल्यावर थोड्याच अंतरावर उन्हाळे गाव लागते.  या गावाच्या प्रवेशद्वारा जवळच एक सुंदर असे मंदिर आहे.  गावात शिरताच प्रवेश द्वाराजवळ गंधकयुक्त गरम पाण्याचे झरे असणारे ते कुंड आम्हाला दिसते.  आम्ही कुंडा जवळ गेलो, तिथे आम्हाला कुंडा मध्ये जाण्यासाठी पुरुषांसाठी महिलांसाठी वेगवेगळे विभाग केलेले आढळले.  आत जाऊन पाहिले तर त्या कुंडातून गरम पाणी प्रवाहीत बाहेर येताना दिसले.  24 तास बारा महिने सतत गरम पाण्याच्या धारा येथे अशाच वाहत असतात असे कळले.  उत्सुकतेपोटी आम्हीही त्या गरम पाण्याला स्पर्श केला आणि गरम पाण्याचा अनुभव घेतला. साधारणतः 30 ते 40 डिग्री सेल्सिअस एवढे पाणी गरम असल्याचे आम्हाला आढळले.  हे गरम पाणी त्वचा रोग नाशक असल्याची भावना येथे येणाऱ्यांची असल्याने येथे येणारे भाविक आंघोळीसाठी फार उत्साही असतात.


     उन्हाळे गावातील गरम पाण्याचे कुंड पाहिल्यानंतर आम्ही असंच पुढे सुप्रसिद्ध अर्जना नदीवरील मोठा पुल पाहण्यासाठी निघालो.  साधारणतः 1 किलोमीटर पुढे गेल्यावर उजवीकडे वळताच आम्हाला अर्जुना नदीवरील ब्रिटिशकालीन छोटा जुना पूल लागला आणि त्या छोट्या पुलावर सोबतच आम्हाला भल्यामोठ्या नवीन महाकाय पुलाचं दर्शन झालं.  ही आहे खालून वाहणारी अर्जुना नदी आणि त्यावर निर्माण झालेला तो एक भला मोठा उंच आणि मोठा पुल,  जो एका क्षणातच नजरेत भरत होता.  त्याला पाहत आम्ही ज्या पुलावर उभा होतो तो मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गारील (NH 66) राजापूर डेपो पासून गोव्याच्या दिशेने जाणारा जुना (दीड किलोमीटर अंतरावरील) ब्रिटिशकालीन पूल होता.  साधारणतः 1940 साली बनवलेल्या व अर्जुना नदीच्या 2 दऱ्यांना जोडणाऱ्या या जुन्या पुलामुळे येथील निसर्ग सौंदर्यात निश्चितच भर पडली होतीच आणि आता तर या जुन्या पूला समोर उभा हा नवीन महाकाय पूल!  फक्त राजापुरच्याच नसून संबंध कोकणाच्या निसर्ग सौंदर्यात भर टाकणारा जाणवत आहे.  अर्जुना नदीवरील या नवीन पुलाचे उंच आणि भक्कम खांब, त्याच्या उंची आणि मजबूतीची साक्ष देत आहेत.  अंदाजे 36 मीटर उंच आणि 300 मीटर लांबीचा आणि 30 मीटर रुंदीचा दुहेरी चौपदरी असणारा हा पुल मोठ्या NH 66 महामार्गावर निश्चितच प्रवाशांना आणि पर्यटकांनाही विशेष व आकर्षित ठरेल.  या दुहेरी मार्गाच्या पुलाच्या उभारणीत एकूण 16 पिलर टाकले गेले असून अर्जुना नदी पत्रातून सुमारे 36 मीटर उंचीचे 2 पुलांसाठी 4 पिलर टाकले असून उर्वरित पिलर प्रारंभी व शेवटी आणि मध्यभागी अशा पद्धतीने टाकलेले दिसत आहेत.  नदीपात्र आणि जमिनीवरून असा एकूण सुमारे 300 मीटर रुंदीचा हा पुल असून यात नदीपात्रातील लांबी ही अंदाजे 220 मीटर तर जमिनीवर लांबी ही सुमारे 80 मीटर इतकी राहणारी वाटतेय.  अर्धा नदीपात्रात आणि अर्धा जमिनीवरील बांधण्यात आलेल्या या दगडी पुलावर आधुनिक गर्डर पद्धतीने बांधकाम केलेले आहे. असा हा भव्य पूल राजापूर आगार सारंगबाग मार्गे थेट डोंगरतिठा असा जोडला गेला आहे.  त्यामुळे या मार्गावरील जवळजवळ सुमारे 11 धोकादायक वळणे कमी होऊन अंदाजे 1 किलोमीटर अंतर कमी झालेले आहे.  आपण जुन्या पुलावरून वरची पेठ च्या दिशेने वर जुन्या वळणाहून पुढे जात दवाखाना आणि शासकीय विश्रागृहाजवळ दोन्हीं नव्या जून्या मार्गांना जोडणाऱ्या शेवडेवाडा या ठिकाणी आल्यास, या ठिकाणी आपणास मुंबई-गोवा महामार्गावरील मागे राजपुरच्या दिशेने जाणारा महामार्ग दिसतो आणि इथून गोवा ठिकाणी जाणारा खालचा जुना महामार्ग आणि आता नवीन मार्ग झालेला महामार्ग हा असा दोन मार्गाचा असणारा फाटा दिसतो.  NH 66 या मार्गाला पूर्वी NH 17 असे नाव होते.  हा चारपदरी महामार्ग नवी मुंबईतील पनवेल पासून सुरू झाला असून हा महामार्ग पश्चिमेकडील उत्तर-दक्षिण दिशेने जातो तो गोव्यापर्यंत, आणि म्हणून या महामार्गाला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग असे म्हणतात.  हा मार्ग सुमारे 500 - 550 किलोमीटर लांब असावा.  या पूर्ण मार्गामुळे प्रवाशांच्या प्रवासातील अंतर 2 ते 3 तासांनी कमी होणार असून प्रवासाचा वेळ वाचणार आहे आणि प्रवास जलद होणार आहे, असे कळते.  छोट्या पुलावरून आपण वरच्या पुलाला पाहत वर आल्यास नविन अर्जुना नदीवरील मोठ्या पुलावरून जाण्याचा मनमोहक आनंद घेतल्या शिवाय आपणांस राहवतच नाही!  या चौपदरी विशाल सुंदर पुलाच्या दोन्ही बाजूला पादचाऱ्यांना चालण्यासाठी पादचारी मार्गही बनवलेला आहे.  या ब्रीज वरून चालताना अथवा प्रवास करतांना अर्जुना नदीचे आणि निसर्गाचे विहंगम दृश्यही नजरेत भरतेच पण सोबत थोडासा वळणदार असलेला हा ब्रिज स्वतःची भव्यता आणि सुंदरताही मात्र दर्शवतोच.  सहाजिकच मुंबई गोवा महामार्ग वरील हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नदीपात्रातील सर्वाधिक उंचीचा जलद आणि सुरक्षित ठरणारा चौपदरी पुल म्हणून राजापूर चे नाव अधिक प्रसिद्ध करणारा निश्र्चितच ठरणार आहे, यात शंकाच नाही.

     आपण कधी राजापूर ला आलात तर निश्चितच या मुंबई - गोवा महामार्गावरील नवीन सुंदर आणि महाकाय विशाल अशा अर्जुन नदीवरील पूलाला अवश्य भेट द्या, तसेच जवळच असलेल्या उन्हाळे गावातील गरम पाण्याच्या कुंडातील गरम पाण्याचा अवश्य अनुभव घ्या!  नंतर पुढे ठरल्याप्रमाणे वैभववाडी येथे जाण्यासाठी याच महामार्गावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लाल परी तून म्हणजेच आपल्या एसटीतून शेवडेवाडा येथून (म्हणजेच जवाहर चौकातून) खारेपाटण ला जाणारी एसटी बस पकडली.  खारेपाटणला उतरल्यावर त्यानंतर दुसऱ्या एसटीने आम्ही खारेपाटण वरून तळेरे येथे आलो.  तळेरे सुद्धा  खारेपाटण प्रमाणे मुंबई - गोवा महामार्गावरच आहे आणि नंतर तळेरे एसटी स्टॅण्ड येथून आम्ही पुढे एसटीने वैभववाडी एसटी स्टँड ला पोहोचलो.  अशा पद्धतीने आम्ही जवाहार चौक म्हणजेच अर्जुना ब्रिजच्या सुरुवातीपासून ते वैभववाडी एसटी स्टॅन्ड हा 2 तासांचा प्रवास करून वैभववाडीत पोहोचलो, यांसाठी प्रत्येकी फक्त 80/- रुपयाचा एस.टी. प्रवासखर्च आला.

     वैभव वाडी हे तालुक्याचे ठिकाण असून बाजाराचेही ठिकाण आहे व ते वाभवे गावाशी संलग्न आहे.  वैभव वाडी एसटी स्टँडच्या उजवीकडे एक सुंदर अशी नवीन वास्तु  निर्माण झालेली आहे.  तिथे 2 दिवस  कार्यक्रमात होता, या विशेष 2 दिवसीय कार्यक्रमाचा वृत्तांत आपण आपल्या Praheek Entertainments & Educare या YouTube वरील दुसऱ्या पुढील व्हिडिओत पाहूच.  पण आता आपण या वास्तू विषयी थोडं जाणून घेऊ!   10मे आणि 11मे असे 2 दिवस "वैभव सोहळा" कार्यक्रम असल्यामुळे इथे सुंदर अशी सजावट केलेली होती.  येथे जी वास्तू उभी आहे तिचं नाव आहे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन!  याच्या प्रवेश द्वारावर वर पहिल्या माळ्यावर बाहेरून प्रदर्शनी ठिकाणी थोर देशभक्त, भारतीय राज्य घटना निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती ऊभा पुतळा दिसतोय.  या भवनाच्या प्रांगणात समोरच सुंदर असे पंचशील उद्यान आहे.  ही जागा या तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक जाणिवेतून आपल्या स्वतःच्या खिशातून दान देऊन आणि लोक वर्गणी गोळा करून 2005 साली शासनाकडून जमीन खरेदी केली आणि पुन्हा आर्थिक भार पेलत या परिसरातील बांधकामाला सुरुवात करुन महत्प्रयासाने 2014 साली हे सुंदर - प्रेरणादायी दुमजली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि सांस्कृतिक भवन आपल्यासमोर निर्माण केले.  अशा या प्रेरक स्मारकाचा लोकार्पण सोहळा 10 मे 2015 रोजी मोठ्या थाटा - माटात संपन्न झाला. त्यावेळेस फक्त वैभववाडी तालुक्यातून नसून तर महाराष्ट्रातून तसेच देश - विदेशातूनही काही सन्माननीय आणि प्रतिष्ठित मंडळी या समारंभास उपस्थित होती.  त्यांनी या ऐतिहासिक सोहळ्याला हजेरी लावून या विलोभनीय प्रेरणादायी वास्तू चे आणि यातून होणाऱ्या चांगल्या कामाचचे कौतुक केले.  लोकवर्गणीतून आणि काहींच्या असीम त्यागातून आज वैभववाडीत एक ऐतिहासिक वास्तू दिमाखात उभी राहिली दिसत आहे.  या स्मारकात खाली तळमजल्यावर अद्ययावत सभागृह आहे तर वर सुसज्ज असा कॉन्फरन्स हॉल आहे,  अतिथी कक्ष आहे, त्याच बरोबर वाचनालय आहे आणि कंप्यूटर लॅबही आहे.  या परिसरात शांती, प्रेम, मैत्री आणि प्रगती यांची साक्ष देत असणारा गोल्डन पॅगोडा आणि थाई पॅगोडा ही आहे.  या भव्य - प्रेरणादायी कामाचे निर्माण करणारे वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ, (मुंबई - ग्रामीण)  व माता रमाई महिला मंडळ, वैभव वाडी  या संस्थेस 21 सप्टेंबर 2022 रोजी 25 वर्षे पूर्ण होत असून त्या पार्श्‍वभूमीवर संस्थे तर्फे हे वर्ष रौप्य महोत्सव वर्ष म्हणून साजरे होत असून त्यानिमित्ताने येथे दर महा प्रबोधनात्मक आणि रचनात्मक कार्यक्रमाची मालिका सुरू करण्यात आलेली आहे.  तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना विशेषतः ग्रामीण, शेतकऱ्यांच्या मुलांना या वास्तूत प्रबोधनकारी, विज्ञानवादी आणि निर्व्यसनी देशभक्त नागरिक बनण्याकामी फार मोलाचे सहकार्य मिळू शकते,  त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत येथील समर्पित कार्यकर्ते फार मोठा मोलाचा वाटा निर्माण करण्याच्या प्रयत्नात असून यानिमित्ताने भविष्यात  यशस्वी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणे आणि हुशार परंतु गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक भार उचलणे तसेच गरजू व आपत्तीग्रस्त लोकांना मदत करण्याचा विचार या संस्थेच्या माध्यमातून या प्रेरणादायी स्मारक भवनात करण्याचा प्रयत्न आहे.  यासाठी त्यांनी मदत करणाऱ्या "दानी" लोकांना मदतीचे आवाहनही केलेले आहे.  संस्थेच्या या महान निर्मितीचे अभिनंदन करित त्यांच्या या समाजहितकारी आणि देशसेवाभावी संकल्पनेला हार्दिक शुभेच्छा देत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व संस्कृतीक भवनास विनम्र अभिवादन करीत आम्ही निघालो.  तुम्ही कधी वैभववाडीला आलात तर या सुंदर आणि ज्ञानाचं प्रतीक असणाऱ्या प्रेरणादायी वास्तूला अवश्य भेट द्या.


     
या 3 ठिकाणच्या अविस्मरणीय भेटीनंतर ठरल्याप्रमाणे आम्हाला मुंबईला निघणे प्राप्त होते, त्यानुसार 13 तारखेला सकाळी आम्ही वाभवे च्या तांबेवाडी मधून वैभववाडी रोड रेल्वे स्टेशनला जाण्याकरिता निघालो. आमची 11.58 ची मुंबई ला जाण्याची ट्रेन होती.  साधारणतः 6 किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशन असल्यामुळे आम्ही अवघ्या 10 ते 12 मिनिटात वैभववाडी रेल्वे स्टेशन ला सकाळी पावणे 10 च्या सुमारास पोहोचलो.  नर्करवाडी वरील हे वैभववाडी रोड रेल्वे स्टेशन ही राजापुर प्रमाणेच मनमोहक!  इथेही राजापूर प्रमाणे स्टेशनच्या बाहेर रिक्षावाले आहेत!  येथेही स्टेशनवरील महत्वाच्या गोष्टी उदारणार्थ, तिकीट घर,  गाड्यांचे वेळापत्रक, स्टेशन मास्तर ऑफिस,  कॅन्टीन & पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधनगृह, प्रवाशांसाठी  वेटिंग रूम इ.  इथेही उंच स्टेशन आणि खाली फलाट!  डोंगर खोदून हे ही स्टेशन बनवले असल्यामुळे आपणांस वरून खालच्या दिशेने स्टेशनच्या फलाटावर जावे लागते.  खाली वैभव वाडी रेल्वे स्थानकाच्या प्लेटफॉर्म वर गेल्यावर तेथेही 3 रेल्वे ट्रॅक दिसत आहेत आणि 2 फलाट म्हणजेच प्लॅटफॉर्म बनवलेले आपल्याला पाहायला मिळताहेत.  आमची ही गाडी 11.58 ची 10104 - मांडोवी एक्सप्रेस ही मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जाणारी सुमारे 1 तास उशिरा म्हणजे 12 वाजण्याच्या दरम्यान आली, पण आम्ही मात्र सुखावलो व ट्रेन पकडून त्यात स्थानापन्न झालो.  ट्रेन वैभववाडी स्टेशन सोडून पुढे जात होती आणि आम्ही खिडकीतून बाहेर निसर्ग सौंदर्य न्याहाळत होतो. थोड्याच वेळाने राजापूर आले आणि राजापूर मध्ये पाहिले तर काय मधल्या रेल्वे ट्रॅक वर रो-रो सेवा!  जशी आपल्या प्रवाशांना इकडून तिकडे घेऊन जाण्यासाठी विविध गाड्यांची रेल्वे सेवा आहे, ज्या प्रमाणे माल व मोठ मोठे सामान घेऊन जाण्यासाठी मालगाडी म्हणजे मालवाहतूक सेवा आहे.  तशीच कोकणामध्ये या संपूर्ण ट्रक्स ना त्यांच्या माला सकट इकडून तिकडे घेऊन जाण्याची सेवाही आहे, त्यास रो - रो सेवा म्हणतात.  पुढे थोड्याच वेळात रत्नागिरी स्टेशन आलं!  रत्नागिरी स्टेशन वर 2 ट्रेन एकत्र विरुद्ध दिशेने जाणाऱ्या सामोरा समोरील फलाटावर दिसल्या.  हा योगायोग कधीतरीच अनुभवता येतो.  पुढे पाहतो तर काय?  स्टेशनवर आंब्यांचे ढीग - ग्राहकांसाठी तयार होते.  फार प्रसन्न वाटलं आणि आंबा हा खरच कोकणाची शान आहे याचा अधिक सार्थ अभिमान वाटायला लागला.

     परतीच्या प्रवासामध्ये आम्ही जरी खिडकीतून बाहेर निसर्ग सौंदर्य पाहत होतो तरी आमचे लक्ष मागील ६ दिवसांमध्ये होते. 1 ल्या दिवशी म्हणजे 8 मे ला आम्ही राजापुरात वरच्या पेठेत आमच्या मामा- मामीं सोबत वास्तव्य केलं होतं, त्यानंतर आम्ही 9 - 10 व 11मे हे 3 दिवस आमचे सन्मित्र अभिजीत तांबे यांच्या घरी वैभववाडीतील वाभवेच्या तांबेवाडीत वास्तव्य केलं होतं.  तेथे दादा - वहिनी आणि आजी- आजोबा  व अन्य सदस्यांनी आमची फार काळजी घेतली.  नंतर आम्ही 12 तारखेला जाधव सरांच्या घरी सांगुळवाडी ला भेट दिली होती आणि त्याच दिवशी वैभववाडी हून 15 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या कुसुर या आमच्या गावातील आई - बाबांच्या गावी राहिलो होतो.  राजापूर आणि वैभववाडीत अजून बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत पण कमी वेळात जेवढे शक्य होतं तेवढे आम्ही या गोष्टी पाहण्याचा आणि सर्वांना भेटण्याचा प्रयत्न केला.  याकामी आम्हाला गावी वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या सर्व जुन्या - नवीन नात्यांना आणि मित्रांना विशेष धन्यवाद!  यां सोबतच आम्हीं आपल्या एसटी सेवेचे आणि त्याचबरोबर जलद प्रवासासाठी बनणाऱ्या महामार्ग प्रकल्पाचे आणि विशेष करून कोकण रेल्वेचे  सर्वांकडून आभार मानतो.  पर्यावरणाकडे लक्ष देत आपण हे प्रकल्प जनसेवेसाठी राबव आहात त्याबद्दल अभिनंदन!  चाकरमान्यांना मुंबईत येण्यासाठी किंवा मुंबईहून गावी जाण्यासाठी ही माध्यमे फार उपयोगी पडताहेत.  पण यात जलद आणि स्वस्त म्हणून कोकण रेल्वेच फार उपयोगी पडत आहे.  उदा. वैभववाडी ते मुंबई असा प्रवास आपण घेतला तर एसटीने आपल्याला साधारण 12 ते 13 तास लागतील, कदाचित या नवीन राष्ट्रीय महामार्गमुळे आणखीन 2 - 3 तास कमी होतीलही म्हणा.  पण तोच प्रवास आपण रेल्वेने केल्यास साधारणपणे 7 ते 9 तास लागतील. त्याच बरोबर रेल्वेचे तिकीट दर ही अन्य मार्गाच्या तुलनेत कमीच आहे, त्यातही सोयीनुसार विविधता आहेच.  आपणास माहितच आहे की,  रेल्वेचे तिकीट भाडे हे विविध घटकांवर अवलंबून असते, जसे - आपण निवडलेला मार्ग, प्रवास अंतर, पसंतीची डबा, वर्ग, आसन, गाडीचा प्रकार, प्रवासाची तारीख, वेळ, आणि व्यक्ती इ. तसेच  तिकीट बुकिंग खिडकीवर किंवा ऑनलाइन करता इ. गोष्टीही या प्रवास भाड्यात समाविष्ट असतात,  तरीही आपण आपल्या बजेटनुसार वा आवडी नुसार म्हणजे थर्ड एसी (3A) कोच, सेकंड एसी (2A) कोच तसेच फर्स्ट एसी (1A) कोच इ. ने प्रवास तिकीट बुक करू शकतो.  त्यामुळे साहजिकच ह्या रेल्वे प्रवास तिकीट भाड्यात बदल असतो किंवा किंमतीत तो बदल जाणवतोही.

     असो, आपण थोडया अधिक महत्वाच्या, आपल्या या कोकण रेल्वेच्या प्रवास सेवे बद्दलही थोडं बोलूच.   कोकणातील डोंगराळ आणि उंच सखल भूप्रदेश आणि हवामानामुळे येणाऱ्या अनेक अडथळ्यांवर मात करून, मोठ मोठाले डोंगर पोखरून त्यातून मार्ग काढत आणि बोगदा बनवीत तसेच अनेक छोट्या-मोठ्या नद्यांवर पूल बांधीत आणि दोन डोंगर दऱ्यांना जोडणारा पूल बांधून अनेक विविध अडचणीवर मात करुन फार मोठ्या परिश्रमाने रेल्वे मार्ग बनवणाऱ्या या कोकण रेल्वेचे आणि ही कोकण रेल्वे चालवणाऱ्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन चे फार फार धन्यवाद!  1990 मध्ये स्थापन झालेल्या कोकण रेल्वेने अवघ्या 8 वर्षात अति परिश्रमाने ही वाहतूक व्यवस्था उभी केली आणि 26 जानेवारी 1998 रोजी संपूर्ण रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आणि आपल्या सर्वांना कोकणात जाण्यासाठी रेल्वे मार्ग सुरू झाला.  या ऐतिहासिक घटनेला 25 वर्ष होत असून कोकण रेल्वे हे वर्ष रौप्य महोत्सव वर्ष म्हणून साजरा करत आहे.  याच वर्षी कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून आता कोकण मार्गाने जाणाऱ्या रेल्वे गाड्या डिझेलच्या ऐवजी विजेवरील इंजिनांच्या साह्याने चालवल्या जाण्यास तयार आहेत.  त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या वेगात वाढ होईलच पण प्रदूषणालाही आळा बसेल तसेच डिझेलसाठी होणारा करोडो रुपयांचा खर्चही वाचेल.  कोकण रेल्वे येण्यापूर्वी कोकणात जाण्यासाठी डायरेक्ट रेल्वे सेवा नव्हती, तेव्हा बसनेच किंवा कार अथवा रस्त्यावरील अन्य प्रवासी - वाहतुकीच्या साधनानेच  जावे लागायचे पण धन्यवाद कोकण रेल्वेचे - आपण आमचा प्रवास सुखकर स्वस्त आणि जलद केलात!   तसेच धन्यवाद - कोकण रेल्वेची संकल्पना मांडणारे त्यावेळचे रेल्वेमंत्री,  तसेच थोर नेते व कार्यकर्ते आणि असंख्य कामगार बंधू तसेच रेल्वे मार्ग निर्मिती साठी या ना त्या कारणाने मदत करणारे लाखो हात, हजारों लोक!  या सर्वांचेच यानिमित्ताने मी - आम्ही आणि सर्व चाकरमनी आपले शतशः आभार मानतो.  कोकण रेल्वेच्या २५ व्या रौप्यमहोत्सवी वर्षात आम्ही कोकण रेल्वे प्रवासाचा अनुभव घेतला कोकणात जाऊन!  त्याबद्दलही आम्ही फारच आनंदी झालोत.  आम्हीं सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद अर्पित करतो आणि सदिच्छा देतो!

     वैभव वाडी हून मुंबईत घरी परतण्याच्या प्रवासात संध्याकाळच्या सूर्यास्ताचा डोंगराआडून नजारा पाहत आम्ही मुंबई जवळ आलो आणि सायंकाळी 7.25 च्या सुमारास आम्ही आलो पनवेलला!  आता आमची गाडी पनवेलहून दिवा मार्गे ठाणे आणि मग पुढे सीएसटीला जाणार आहे.  आम्हाला कुर्ल्याला उतरायचे असल्यामुळे आम्ही ठाणे येथे उतरून स्थानिक लोकल पकडून आम्ही कुर्ल्याला रात्री  9.30 ला सुखरूप पोहोचलो!

     तर मित्रहो, असा झाला आमचा मुंबई टू कोकण आणि कोकण ते मुंबई मस्त झकास प्रवास!   कोकणात बघण्यासारखं भरपूर आहे, पूर्ण महिना सुट्टी काढून जरी तुम्हीं कोकणात फिरायला गेलात ना तरी सर्व ठिकाणं पाहून होणार नाहीत.  ते नयन रम्य कोकण निसर्ग सौंदर्य बघून आपल्या डोळ्यांचे पारणे फिटते.  अहो कोकण निसर्ग सौंदर्य आपल्या डोळ्यात पूर्णपणे मावुच शकणार नाही.  अहो, हा रमणीय प्रवास कधी संपूच नये असेच तुम्हाला वाटेल.  तुम्ही हा अनुभव स्वतः अनुभवण्यासाठी कोकणास अवश्य भेट द्या आणि कोकणातील सुंदर सफरीचा आनंद घ्या!  शेवटी पुन्हा आम्ही हेच म्हणू - येवा, कोकण आपलोच आसा!

           जय भारत!  जय महाराष्ट्र!  जय कोकण!

   👉🏻 Watch this Video on our Youtube Channel (Click Here) 👈🏻


Prasheek Times - Read New Articles